- पिंपरी चिंचवड आरटीओचा खासगी वाहन चालकांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२२) :- गणेशोत्सव आणि गौरीपूजन सणासाठी शहरातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. अशा काळात खासगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने २७ वाहनांची तपासणी केली आहे. तसेच अशी वाहने आणि बुकिंग स्टॉलवर कारवाई करणार असल्याचे आदेशही दिले आहेत.
शहरात रोजगारासाठी आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सव आणि गौरीपुजन सणासाठी बऱ्याच नागरिकांना आपल्या गावाची ओढ लागते. मात्र शहरातील खासगी वाहन चालक नागरिकांच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेताना दिसतात. बऱ्याच खासगी वाहनांची तिकीटे दामदुप्पट दराने विकली जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. म्हणून या विरोधात शहरातील आरटीओ विभागाने तपासणी सत्र सुरू केले आहे. त्याबाबत शहरातील प्रत्येक बुकिंग स्टॉलला सुचना देखील देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीटापेंक्षा दीडपट भाडेवाढ खासगी वाहन आकारू शकतात. मात्र याहुन अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनांवर आणि तिकीट बुकिंग स्टॉलवर आरटीओ कारवाई करू शकते.
नियमांचं उल्लंघन करून वाहतुकीच्या दरात वाढ होत असेल तर त्या त्या वाहनांचे परमीट रद्द केले जाते. तसेच याबाबत कुणाची तक्रार असेल तर उपप्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी आमची तपासणी मोहीम सुरू आहे. म्हणून खासगी वाहन मालक आणि तिकिट बुकिंग स्टॉल धारकांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा कारवाईला तोंड द्यावे लागेल. – अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर…















