न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुण वयातच रयतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प सोडला आणि तो प्रत्यक्षात आणला. त्यासाठी निर्व्यसनी, साहस, निर्मिती क्षमता, निश्चयाचे बळ, शौर्य, चारित्र्य आणि ध्येयनिष्ठा या गुणांचे संवर्धन त्यांनी केले होते. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर साहसी निर्णय घ्यावे लागतात, हे शिवरायांकडून शिकावे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक आणि व्याख्याते डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांनी आज पिंपरीतील एच. ए. कॉलनी येथे श्री शिव-स्मारक प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अरुण बोऱ्हाडे होते.
शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीमागे सुरेख नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य दिसून येते. स्वराज्याची उभारणी करतानाच राज्यातील रयतेसाठी रोजगार निर्मितीच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. भविष्यात आपल्या देशाला सागरी मार्गानेच अधिक धोका असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यासाठी जगातील सर्वोत्तम आरमाराची त्यांनी निर्मिती केली. राज्याच्या रक्षणासाठी गुप्तचर यंत्रणेचे महत्त्व जाणून त्यांनी त्याचा प्रत्येक ठिकाणी योग्य वापर करून घेतला, असे सांगून डॉ. बोऱ्हाडे यांनी आजच्या तरुणाईने शिवरायांच्या गुणांचा आदर्श घेऊन जीवनातील आव्हानांचा मुकाबला करावा आणि जीवनाचे सार्थक करावे, असे सांगितले.
यावेळी महापौर राहूल जाधव यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेविका सुलक्षणा धर, महंमदभाई पानसरे, विजय कापसे, अमिना पानसरे, चंद्रकांत पुरम, सुनिता शिवतारे, विजय पाटील, शंकर बारणे, राजेंद्र जाधव, दिलीप कदम, कैलास नरुटे, प्रविण रुपनर, अरुण पवार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार चाबुकस्वार व अरुण बोऱ्हाडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. एच. ए. माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला.
श्री शिवस्मारक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कुमार बोरगे, सरचिटणीस बाळासाहेब साळुंके, उपाध्यक्ष सुरेंद्र पासिलकर, मोरेश्वर थिटे, संतोष ढोरे, सर्जेराव जुनवणे, प्रकाश थोरात, रमेश खराडे, नंदकुमार अडसूळ, राजेंद्र कलापूरे, घनश्याम निम्हण, शामकांत काळे, सुनिल बडदाल आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
नितीन नलावडे यांनी सुत्रसंचालन आणि सर्जेराव जुनवणे यांनी आभार मानले.











