- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २० फेब्रु.) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले.
यावेळी शाळेचे संस्थापक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, तसेच पालक वर्ग सुधीर करंजेकर, स्मृती करंजेकर, प्रदीप भोसले, नीता भोसले, रुपाली धनवटे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
शाळेचे संस्थापक संदीप काटे म्हणाले की, संशोधनातूनच देशाला प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करुन, जनतेला व शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील, अशा उपकरणांची निर्मिती करावी. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात प्रकल्प सादर करुन, विज्ञानाविषयी गोडी दाखवून दिलीच आहे. विद्यार्थी दशेतच संशोधनाचे बीज त्यांच्यात रोवले जावे, या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येते, असे काटे यांनी सांगितले.

हे विज्ञान प्रदर्शन ‘LUMINESCENCE’ या संकल्पनेवर आधारित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा उपकरणे, वृक्षसंवर्धन काळाची गरज, पाणी अडवा पाणी जिरवा, मत्सपालन, अंतराळामधील ग्रह व ताऱ्यांची माहिती सांगणारी आकाशगंगा, सूर्यमालेचे चालणारे काम, हवेच्या दाबावरती चालणारी उपकरणे, इतिहासावर आधारित प्रकल्प तसेच टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे आदी प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात सादर केले. शाळेत मुलांनी काढलेली चित्रे व हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, विज्ञान शिक्षिका अपर्णा सरवटे आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शन यशस्वीरितीने पार पडले.











