- तर, पिंपरीतील अनिल जाधव टोळीवर मोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- सांगवी परिसरातील सराईत गुंड जोग्याला अखेर येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अक्षय हेमंत जाधव (वय २५, रा. जुनी सांगवी) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोग्या याच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात मागील तीन वर्षात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा गुन्हेगारीचा चढता आलेख पाहून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी एमपीडीएची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, उपआयुक्त अपर आयुक्त यांच्या मार्फत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी (दि. ८) या प्रस्तावाला मंजुरी देत जोग्याची यरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
अनिल जाधव टोळीवर मोका..
पिंपरी येथील सराईत गुन्हेगार अनिल जाधव टोळीवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये ( मोका ) कारवाई केली. मंगळवारी (दि. ६) अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. टोळी प्रमुख अनिल ऊर्फ संतोष ऊर्फ अन्या गोरख जाधव (वय ३०, रा. कुदळवाडी, चिखली), सूरज ऊर्फ बंट्या दत्तू गायकवाड ( वय २२, रा. फुरसुंगी, हडपसर), सज्जाद रियाज शेख (वय १९, रा. चिंचवड), सुप्रीम राजू काळे (रा. चिंचवड), विनायक क्षीरसागर (रा. चिंचवड), नीलेश हेळवार (रा. चिंचवड), नाईटी पूर्ण नाव पत्ता माहिती नाही अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
















