न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३ मे) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक ७४ लाख ९७ हजार रुपये प्रचार खर्च हा शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५३ लाख ६९ हजार रुपये प्रचारावर खर्च केला आहे. दोघाही उमेदवारांच्या प्रचार खर्चात तफावत येत असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तिसरी नोटीस बजाविण्यात आली आहे.
शिरूर मतदारसंघांतील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात आली. पहिली तपासणी ३ मे, दुसरी ७ मे, तर तिसरी तपासणी ११ मे रोजी करण्यात आली. या तिन्ही तपासणीत शिरूरमधील आढळराव, कोल्हे यांच्या प्रचार खर्चात तफावत आढळली होती. त्यामुळे शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी काही खर्च मान्य केला, तर काही खर्च अमान्य केला होता. शेवटच्या खर्च तपासणीत देखील या दोघांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाच्या शेंडो रजिस्टरमधील खर्चात तफावत आली आहे.
प्रतिनिधींना हजर राहावे लागणार
दरम्यान, प्रचार खर्चातील तफावतीबाबत आढळराव, कोल्हे यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर खुलासा करावा लागणार आहे. खुलासा न केल्यास हा खर्च मान्य असल्याचे समजून संबंधित उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. तसेच ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर ३० दिवसांत शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या खर्च निरीक्षकांसमवेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहून खर्चातील तफावत दूर करावी लागणार आहे.











