न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने ताथवडे व थेरगाव परिसरात सुरळीत वाहतुकीसाठी उड्पूडाणल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ताथवडे येथील वळुमाता प्रक्षेत्रातील जागा पालिका घेणार आहे. त्या बदल्यात पालिका काँक्रीटचे रस्ते, पंपहाऊस व पाईपलाईन बदलणे, औंध येथे विविध इमारतींचे बांधकाम असे एकूण ३० कोटींचे काम करून देणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता मंगळवारी (दि. ६) दिली.
उड्डाणपुलासाठी जागा मिळावी, म्हणून पालिकेने पशुसंवर्धन विभागास जागा हस्तांतरीत करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२२ ला कळविले. ताथवडेतील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत अस्तित्वातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अंतर्गत रस्त्यांचा आराखडा व त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. विभागाच्या सूचनेवरून प्रक्षेत्रातील अंतर्गत रस्ता काँक्रीटचा करण्यासाठी १८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पंपहाऊस दुरुस्ती करणे व पाईपलाईन बदलण्यासाठी ४ कोटींचा खर्च आहे. औंध येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर तसेच, ताथवडे प्रक्षेत्राच्या जागेवर विविध इमारतींचे बांधकाम करण्यासाठी ८ कोटी खर्च अपेक्षित आहे.
यानुसार, अंदाजपत्रक तयार करून त्या कामासाठी ५ ऑगस्ट २०२२ ला तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे. तसेच, सन २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात एकूण १० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. या खर्चास सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आयुक्त सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे उड्डाणपुलासाठी लवकरच पालिकेच्या ताब्यात जागा येणार आहे.