- ठेकेदार अटकेत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- गेल्या काही दिवसांपासून पिंपळे गुरव परिसरात पवना नदी शेजारी भगवान शंकराच्या मंदिराचे बांधकाम सुरु होते. काल बुधवार (दि. २०) रोजी या मंदिराचे काम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळल्याने बांधकाम मजूर स्लॅबच्या मलब्याखाली अडकले होते.
मलब्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले व त्यांना पुढील उपचारांसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केले होते. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या कामगारांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यातील तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, आठ मजूर जखमी झाले आहेत. सिद्धम्मा मनतप्पा पुजारी (वय ३०, रा. बोपोडी), मानतोष संजीत दास (वय ३०), प्रेमचंद शिबू राजवार (वय ३१, दोघे रा. लेबर कॅम्प, पिंपळे निलख. मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.
पोलिसांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर यांनी राहुल जयप्रकाश जगताप (वय ३६, रा. पनदरे, ता. बारामती) या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून, सांगवी पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे.











