न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी आरोपीला तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला. त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता दुसऱ्या आरोपीने सरकारी कामात अडथळा आणला.
पोलिसांच्या अंगावर धावून येत ‘माझ्या भावाला सोडा तुमचा काय संबंध, एकेकाला बघून घेतो’ असे म्हणत सोबत असलेले श्वान पोलिसांच्या अंगावर सोडले. या श्वानाने पोलिस नाईक संदीप पाटील यांच्या पायाला चावा घेतल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर हा आरोपी म्हातोबानगर झोपडपट्टीत पळून गेला. त्याच्याकडील पिशवीत २० हजार २५० रुपये किमतीचा गांजा, रोकड व एक मोबाईल असा ४१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल होता.
ही घटना डांगे चौक ते वाकड रोड येथे घडली. पोलिस हवालदार प्रदीप शेलार यांनी फिर्याद दिली आहे. सागर प्रकाश घाडगे (वय २४, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) याला पोलिसांनी अटक केली असून, अशोक तुपेरे (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.