न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रायगड (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या दोघांना अनेक खुलासे केले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी १२०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यांची अजून चौकशी करण्यात आली असता, मुंबईच्या बंदरावरही एक कंटेनर असल्याचं समोर आलं होतं.
याच माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांचं विशेष पथक दोन्ही आरोपींना घेऊन न्हावाशेवा बंदरावर दाखल झाले आणि कारवाई करत तब्बल २२ टन हेरॉइन जप्त केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्यानुसार, हेरॉइनची किंमत एकूण १७२५ कोटी इतकी आहे.
विशेष पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा कंटेनर दिल्लीला नेण्यात आला आहे. या कारवाईमुळे नार्को टेरर कशा पद्दतीने आपल्या देशावर परिणाम करत आहे हे स्पष्ट होत. देशात ड्रग्ज आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात असल्याचंही स्पष्ट होत आहे”. दिल्ली पोलीस खात्यातील डीसीपी प्रमोद कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
















