- शिवसेनेचे संतोष सौंदणकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव हे दोन्ही उत्सव हिंदूंची अस्मिता आहेत. ज्या पद्धतीने गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा झाला. त्याप्रमाणेच नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी दुर्गा देवी मंडळांना बिनशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना आपण आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या. शिवाय, त्यांच्याकडून आकारण्यात आलेले शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील गणेशभक्तांकडून आनंदात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आपण हिंदुत्वाच्या मुद्यावर राज्यात सत्ता स्थापन केली. परंतू, आपल्या राजवटीत हिंदूंच्या सण-समारंभावर प्रतिबंध घातले जात आहेत. आपल्या या भूमिकेमुळे हिंदूंवर अन्याय होत आहे. सध्या राज्यात नवरात्रौत्सवाचा माहोल सुरू आहे. अशा वातावरण आपल्या सरकारकडून नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. ही बाब हिंदुत्व जपण्यासाठी घातक आहे.
गणेशोत्सवाप्रमाणेच आपण नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी देखील दुर्गा देवी मंडळांना बिनशर्त परवानगी द्यावी. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नयेत. तसेच, गरबा-दांडिया भरवण्यासाठी देखील विनाअट परवानगीसाठी एक खिडकी योजनेस मंजुरी द्यावी, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.