न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- किडनीचा विकार बळावल्यानंतर त्याच्यावर होणारे सर्व उपचार जेव्हा निष्क्रिय ठरतात आणि किडनी निकामी होते. त्यावेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य कोणीतरी करणे आवश्यक असते. त्यासाठी डायलेसिस हा पर्याय निवडला जातो. डायलेसिस मशीनद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. किडनी सारखे कृत्रिमरीत्या कार्य हे मशीन काम करते. रक्तातील क्रिएटिन, युरिया सारखे विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीरातील जास्तीचे पाणी बाहेर काढले जाते. शरीरातील क्षारांचे प्रमाण हे मशीन नियंत्रणात ठेवते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात डायलेसिस विभाग सुरू करण्यात येणार आहे. जम्बो कोरोना सेंटर येथील साहित्य काढण्यात आल्याने डायलेसिस मशीन नवीन थेरगाव रुग्णालयात स्थलांतर करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच ऑरो प्लांटही स्थलांतर करण्यात आला आहे. डायलेसिस विभाग सुरू करण्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली असून, लवकरच विभाग सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सद्यस्थितीत डायलेसिस सुविधा आहे. वायसीएम रुग्णालयातील डायलेसिस विभागात ७ बेड आहेत. महापालिकेच्या इतर कोणत्याही रुग्णालयात डायलेसिसची सुविधा परिणामी नाही. वायसीएम रुग्णालयात डायलेसिससाठी रुग्णांची गर्दी असते. थेरगाव रुग्णालयात डायलेसिसची सुविधा सुरू झाल्याने शहरातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. तसेच टप्प्याने महापालिकेच्या रुग्णालयातही डायलेसिस विभाग सुरू करण्याचे प्रास्तावित असल्याची माहिती आहे.