न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- सर्वोच्च न्यायालयाने रुपी बँकेबाबत अर्थमंत्रालयाकडे होणाऱ्या सुनावणीपर्यंत बँकेचा परवाना रद्द करून त्यावर अवसायक नेमण्यास स्थगिती कायम ठेवली आहे. आरबीआयने चालू वर्षी ८ ऑगस्ट रोजी रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश प्रसृत केले. त्यानुसार २२ सप्टेंबरपासून रुपी बँक अवसायनात काढण्यात येणार होती.
मात्र, उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी होऊन न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी या आदेशाला १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यावर आरबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने हा निकाल दिला.
दरम्यान, आरबीआयच्या बँक अवसायतनात काढण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी रुपी बँकेने अर्थ मंत्रालयाचे सहसचिव यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर १९ सप्टेंबरला सुनावणी झाली. मात्र, अंतरिम स्थगिती नाकारून सुनावणीची पुढील तारीख १७ ऑक्टोबर देण्यात आली आहे. मात्र, आरबीआयने ही सुनावणी ४ ऑक्टोबरला ठेवली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. बँकेच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरबीआयचा रुपीबाबतचा हेतू शुद्ध नसल्याचा युक्तीवाद केला. त्यावर सर्वोच्च न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी रुपीबाबत अर्थमंत्रालयाकडील सुनावणी होईपर्यंत आरबीआयच्या बँक अवसायनात काढण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.