न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- सध्या देहूतून कचरा गोळा करून तो गायरानातील एका खाणीत टाकला जातो. मात्र हे कर्मचारी हा कचरा खाणीत टाकण्याऐवजी रस्त्याच्या कडेलाच टाकत आहेत. याबाबत ग्रामस्थ वारंवार तक्रार करीत आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराकडून दखल घेतल्याचे दिसून येत नाही.
कचरा उचलणारी गाडी येण्याची निश्चित वेळ नाही, कचरा गाडी चालक मात्र गोळा केलेला कचरा रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. याबाबत संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, अशी मागणी होत आहे.
देहू नगरपंचायत हद्दीतील कचरा उचलण्याचा ठेका सुमारे पावणेदोन कोटी रुपयांना दिला असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुमारे एक कोटी रुपयांची कचरा वाहण्यासाठी १० वाहने खरेदी केलेले आहेत. देहूतील कचरा येथील गायरानातील खाणींमध्ये टाकला जात आहे. येथे त्याची दुर्गंधी देखील पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील कामगार वर्ग आपला कचरा रस्त्याला टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अशांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
















