न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- सालाबादप्रमाणे याही वर्षी कलारंग सांस्कृतिक कला संस्था, पिंपरी चिंचवड च्या वतीने ‘कलारंग त्रिवेणी संगम २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्या रविवार (दि. २४) रोजी सकाळी ११:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष हे या कार्यक्रमचे विशेष आकर्षण असणार आहे. सोहळ्यानिमित्त पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अतुल परचुरे यांच्याशी पु. ल. या विषयावर सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर गप्पा मारणार आहेत.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, महापौर राहूल जाधव, उमा खापरे, राजेंद्र घावटे, पितांबर लोहार, भालचंद्र मगदुम, राज अहिरराव, सुरेश पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे
यावेळी स्वप्नजा लेले, संदीप उबाळे यांच्या सुमधुर गायनांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. त्यांना केदार परांजपे, अमित कुंटे, रोहन बनगे, अपूर्व द्रविड हे साथ-संगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे करणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजक व उद्योजक अमित गोरखे, शैलेश लेले, नगरसेविका अनुराधा गोरखे, वैभव गोडसे, दिनेश मारणे, आशा नेगी, पूजा बागुल व सुप्रिया धाईंजे यांनी शहरातील नागरिकांना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.