न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२२) :- पवना धरणातून पिंपरी चिंचवड भागातील निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाइपलाइन टाकून पाणी आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.
पवना धरणातून निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाईपलाईन टाकून पाणी आणण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पास स्थानिक नागरिकांनी विरोध करण्यासाठी मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील बऊर टोलनाका येथे २०११ साली रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाप्रसंगी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे १० ऑगस्ट २०११ रोजी जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेल्या पत्रान्वये या प्रकल्पाचे काम थांबविण्याबाबत विनंती केली होती. तसेच त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीदेखील प्रस्तावित थेट पाईपलाईन योजना राबविणे संबंधात ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सदरचे काम बंद आहे.
दरम्यान, महापालिकेच्या आयुक्तांनी पिंपरीमधील ॲटोक्लस्टर येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन बंद असलेले काम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार या बैठकीत विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानुसार पवना धरणापासून सेक्टर क्रमांक २३ निगडीपर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादन केलेले क्षेत्र, पवना धरणावर महापालिका निधीतून चालू असलेले शिवणे आणि गहुंजे येथील बंधारे बांधण्याचे काम, पवना धरणापासून पाईपलाईन एक्स्प्रेस-वे निगडीपर्यंत लगत टाकणेकामी संपादित क्षेत्राची साईट व्हिजिट करणे, या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून, पुढील कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.















