न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २५ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडी आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे महिलांना सक्षम व उद्योग क्षेत्रांत सहभाग वाढवण्यासाठी महीला उद्योग मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आघाडीचे अध्यक्ष अभय भोर होते
याप्रसंगी महिलांचे समूह ग्रुप बनविण्यात आले आहेत व प्रत्येक महिलांच्या समूहाला उद्योगांसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच संबंधित उद्योगांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. काही महिलांना तांत्रिक प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे.

ग्रुप इंडस्ट्रीज कन्सेप्ट २००८ साली उद्योजक आणि माजी नगरसेवक सोपानराव भोर यांनी या योजनेची मुहूर्तमेढ रोवली होती. या योजनेस आता मूर्त स्वरूप देण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. महिला कामगारांच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. अनेक ठेकेदार कंपनीकडून व महिला कामगारांकडून पगारातील कमिशन घेतात. त्यामुळे महिलांच्या हाती कमी पगार मिळतो. वेळ प्रसंगी त्यांना दमदाटी केली जाते. त्याकरीता महिला सक्षम होण्यासाठी महिला कृती समितीची स्थापना करण्यात येणार आहे. याप्रसंगी महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी लवकरच मोफत उद्योग, आधार कार्ड व अनेक योजनांचा लाभ या माध्यमातून देण्यात येणार आहे. कंपनीतून काही महिलांना घरगुती कामासाठीही मदत करण्यात येईल, असे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी फोरमचे अध्यक्ष अभय भोर तसेच कार्तिक गोवर्धन, दादाराव कांबळे, उषा शिंदे, राहुल भगत व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.











