न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- पुनावळे परिसरात एका कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
कारमधून अचानक धूर निघू लागल्यानंतर काही वेळातच आगीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीची तीव्रता इतकी होती की काही मिनिटांत संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळविण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणामुळे आग लागली का, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे.

















