- १०० खाटांचा ”क्रिटिकल केअर ब्लॉक” लवकरच कार्यान्वित होणार…
- जिल्ह्यातील नागरिकांना एकाच छताखाली मिळणार अत्याधुनिक उपचार सुविधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणून विकसित करण्यात येणार असून, १०० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश आमदार शंकर जगताप यांनी दिले. या सुविधेमुळे पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील नागरिकांना गंभीर व आपत्कालीन आजारांवर अत्याधुनिक उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा, प्रलंबित कामे आणि अंतर्गत समस्यांचा जगताप यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. यावेळी एमआरआय, सीटी स्कॅन आणि एक्स-रे युनिटची पाहणी करण्यात आली. रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर, आयसीयू, अत्याधुनिक वॉर्ड आणि ओपीडी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
ओपीडीची क्षमता वाढविणे, मनुष्यबळ व वैद्यकीय यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन करणे, तसेच बर्न वॉर्ड, एसएनसीयू, अतिरिक्त आंतररुग्ण कक्ष, एसटीपी-ईटीपी प्रकल्प आणि प्रतीक्षालयाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रुग्णालयातील स्वच्छता, पाणी, वीज, ड्रेनेज, अग्निसुरक्षा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. महिलांसाठी ‘पिंक टॉयलेट’, अंडरपासमध्ये सीसीटीव्ही व प्रकाशव्यवस्था आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
“सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा अधिक बळकट होत आहे. याच माध्यमातून हे जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम, सुरक्षित, सुविधायुक्त आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी सूचना केल्या आहे. जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या रूपात रुग्णसेवेत आणण्यासाठी आवश्यक कामांना गती देण्यात येत आहे. रुग्णालयातील १०० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी प्रत्येक कामाचा नियमित पाठपुरावा केला जाईल.”
— शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदार संघ

















