- ६० वर्षांवरील ज्येष्ठांना बस पासमध्ये ५० टक्के सवलत; अपघातग्रस्तांना १ लाख, मृत्यू झाल्यास ३ लाखांपर्यंत मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता, सेवा कार्यक्षमता आणि प्रवासीहिताच्या विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच बस अपघातात जखमी झालेल्यांना १ लाख, तर मृत्यू झाल्यास वारसांना ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रवासी सुरक्षेसाठी पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये डॅशकॅम बसविण्याबाबत चर्चा झाली. नवीन बसेस उपलब्ध करणे, फीडर सेवा सक्षम करणे, बसफेऱ्यांचे नियोजन आणि ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यावरही भर देण्यात आला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत तसेच ३७ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा, लेखापरीक्षण, GST, TDS, PT आणि ROC अनुपालनाचाही आढावा घेण्यात आला.
“ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. प्रवासी सुरक्षितता आणि पीएमपीएमएलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर राहील,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. तर प्रवासीहिताचे निर्णय प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सभापती अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले.


















