न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- नागा साधू असल्याचे सांगून आशीर्वादाने भरभराट व सुख-समाधान मिळेल, असे भासवून एका व्यक्तीची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ व ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत रामचंद्र पाटील (वय ४९, रा. थेरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास मोरवाडी येथील मनपा आयुक्त बंगल्यासमोरील रस्त्यावरून पाटील हे कारमधून जात होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागून कारमध्ये प्रवेश केला.
त्याने आपण नागा साधू असल्याचे सांगत आशीर्वादामुळे जीवनात भरभराट आणि सुख-समाधान मिळेल, असा विश्वास पाटील यांना दिला. त्यानंतर त्यांना हातातील सोन्याची अंगठी काढण्यास भाग पाडले. अंगठी डोळ्यांना लावून ती कारच्या गिअरजवळ ठेवत असल्याचे भासवून त्याने ती स्वतःजवळ ठेवली आणि कारमधून निघून गेला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संशयित साधू अंगाने जाड, सुमारे पाच फूट पाच इंच उंच, सावळ्या रंगाचा असून भगवे कपडे परिधान केले होते. डोक्यावर फेटा आणि हातात मोठे कडे होते. तो हिंदी भाषेत बोलत होता. पुढील तपास पोलीस हवालदार व्होनमाने करीत आहेत.

















