न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईला गती देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले. कारवाईत हलगर्जीपणा किंवा दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता सुनील बागवानी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षक उपस्थित होते.
प्रत्येक बीट निरीक्षकाने आपल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून नव्याने सुरू झालेली अनधिकृत बांधकामे शोधून तातडीने कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या भूखंडांवरील अतिक्रमणे, विनापरवाना टपऱ्या आणि पदपथांवरील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याचे निर्देश देण्यात आले.
तक्रारींची प्रतीक्षा न करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह नियमित गस्त आणि सर्वेक्षण करण्यावरही भर देण्यात आला.


















