न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- खडकी येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळच्या वेळी आराम बस व अवजड वाहनांना नाशिक फाटा मार्गे खडकीकडे जाण्यास शनिवारपासून (दि. २२) मनाई करण्यात आली आहे.
आराम बस या नाशिक फाटा येथून फुगेवाडी, हॅरिस ब्रिज मार्गे खडकी येथून पुण्याला जातात. त्यामुळे खडकी रेल्वे ट्रक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहनांच्या रांगा हॅरिस ब्रिज पर्यंत येतात. त्यामुळे नाशिक फाटा मार्गे खडकीकडे जाणाऱ्या आराम बस व अवजड वाहनांना सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने नाशिक फाटा येथून डावीकडे वळून सीआयआरटी गेट येथून यु टर्न घेऊन नाशिक फाटा उड्डाणपूल मार्गे म्हसोबा चौक, कोकणे चौक, जगताप डेअरी चौकाकडून डावीकडे वळून औंध रोडने इच्छित स्थळी जातील.
तसेच नाशिक फाटा येथून डावीकडे वळून भोसरी उड्डाण पुलावरून जय गणेश साम्राज्य चौक (पांजरपोळ चौक) येथून उजवीकडे वळून अलंकापुरम सोसायटी पुढे तापकीर चौकातून उजवीकडे वळून दिघी विश्रांतवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.