- गुन्हेगारांकडून तब्ब्ल १६ गुन्ह्यांची उकल; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- जागेच्या वादातून नातेवाइकांवर गोळीबार करून प्राणघातक हल्ला केलेल्या आरोपींना हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून घरफोडी, चोरीचे सोळा गुन्हे उघडकीस आले.बी विक्की ऊर्फ विकास मुरली रजपूत (वय २४, रा. वेणूनगर, वाकड), पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (वय २०, रा. मु. पो. भोसे, ता. खेड), ज्ञानेश्वर ऊर्फ काळ्या ऊर्फ शीतरून गब्बर रजपूत (वय २०, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, पुणे), राजू अक्षय ठाकूर (वय २०, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
२० ऑक्टोबरला येशू लुटेरा मारवाडी (रा. दत्तवाडी, नेरे) यांचा चुलत पुतण्या विकी रजपूत हा जागेच्या वादातून साथीदारांसह मारवाडी यांच्या घरी आला. फिर्यादीसह त्यांचे चुलते नागू मारवाडी, चुलत भाऊ नितीन मारवाडी व वडील लुटेरा मारवाडी यांना शिवीगाळ केली. विकीने येशू मारवाडी यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. यामध्ये ते जखमी झाले. फिर्यादी स्वतःला वाचविण्यासाठी घरात लपून बसले असता आरोपींनी फिर्यादीच्या भावासह वडिलांना दगड मारले. त्यानंतर विकीने पुन्हा पत्र्याच्या शेडवर गोळी झाडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कस्तुरे चौक येथे सापळा रचला. दुचाकीवरून आरोपी पळून जात असताना त्यांना ताब्यात घेतले.
या तपासादरम्यान राठोड, राजपूत, ठाकूर व त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यातील दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ सप्टेंबर २०२२ ला सोने व्यापाऱ्यावर गोळीबार व तलवारीने मारहाण करून सोने-चांदीचे दागिने लुटल्याचे समोर आले. या दरोड्याच्या गुन्ह्यात ते फरारी होते. तसेच या आरोपींनी चोरी, जबरी चोरी व घरफोडीचे हिंजवडी ठाण्याच्या हद्दीत १३, निगडी हद्दीत एक व पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन असे एकूण १६ गुन्हे केल्याचेही समोर आले. त्यांच्याकडून आठ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार व अंमलदार यांच्या पथकाने केली.