- वाहन चालकाला लोखंडी रॉडने मारहाण; अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- लाल रंगाच्या ब्रिजा गाडीमधील तीन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासवत फिर्यादीची ह्युंदाई अॅक्सेंट गाडी (डीएल ७ सीपी ७५८०) रस्त्यात अडवली. फिर्यादीकडे गाडीचे लायसन्स व कागदपत्राची विचारणा केली. ‘ तुम्ही आमच्यासोबत पोलीस चौकीला चला ‘ असे सांगुन फिर्यादीला त्यांच्या गाडीत बसुन थोडे पुढे अंतरावर नेवून फिर्यादीच्या खिशातील सॅमसँग कंपनीचा ६८,००० रूपये किंमतीचा मोबाईल फोन जबरजस्तीने काढुन घेवुन चोरी केली.
फिर्यादी यांनी त्यांना विरोध केल्यामुळे फिर्यादीला त्या तीन इसमांनी हाताच्या चापटीने मारहाण करून व त्यातील एका इसमाने लोखंडी रॉडच्या सहाय्याने फिर्यादीच्या उजव्या पायावर रॉड मारल्याने गुडघ्याच्या खाली फँक्चर होवुन जबर दुखापत झाली. तसेच डाव्या हातावर लोखंडी रॉड मारल्याने डाव्या हाताचा अंगठा व हाताचे पोटरीचे हाड फॅक्चर झाले आहे. ही घटना (दि. ३०/१०/२०२२) रात्री २.०० ते २.३० वा. सुमारास खेडमधील गोलेगाव, पिंपळगाव रोडवर घडली.
फिर्यादी विशाल विष्णु देवकर (वय ३८ वर्षे रा. बी १३, संत गाडगे महाराज सोसा, शास्त्री चौक, भोसरी) यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अनोळखी तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.