- पीएमआरडीएचे दुर्लक्ष; लाभार्थ्यांची आर्थिक ओढाताण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) प्राधिकरण सेक्टर क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक स्वहिस्सा रक्कम भरली आहे. मात्र, ऑक्टोबर महिना संपला तरी, अद्याप सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन लागत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष व विधी विभागाचे उपशहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे तक्रार केली आहे.
सोनवणे यांनी सांगितले की, काही लाभार्थ्यांनी सदनिकांची रक्कम कर्ज काढून भरली आहे. त्याचे हप्तेही सुरू झाले आहेत. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यातील दिवाळीत सदनिकेचा ताबा देऊ असे सांगितले होते. मात्र, ऑक्टोबर महिना संपूनही अद्याप ताबा दिलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना सध्या राहत असलेल्या घराचे भाडे तसेच, कर्जाचे हप्तेही भरावे लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. सदनिकेचा लवकरात लवकर ताबा द्यावा. खरेदी दस्तनोंदणी मेट्रोचा एक टक्का कर लावू नये. विलंब शुल्क लावू नये. वर्षभर मेंटेनन्स चार्जेस पीएमआरडीएने भरावे. स्वहिस्सा भरलेली रकमेची पावती दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


















