- २६ जण अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त; पोलीस आयुक्तालयाची धाडसी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- निगडी, देहुरोड व वाकड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर लॉटरी, जुगार, व्हिडीओ पार्लर व वेश्या व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई करीत बेकायदेशीर धंदे उध्वस्त केले आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. १५) रोजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत अमृतकर, सपोआ, गुन्हे व पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडील युनिट १ ते ५ तसेच खंडणी, अ.मा.वा. प्र. विभागाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली.
निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील पवळे ब्रिज जवळील बसस्टॉप मागे असणाऱ्या जयप्रकाश मार्केटमधील सचिन शंकर रोमन, विजय शंकर रोमन, (दोघे रा. साईनाथ नगर, निगडी), रितेश अशोक केशवानी (यमुनानगर निगडी), आनंद प्रसाद (रा. मोरे वस्ती, चिखली) केतन उर्फ बंटी बदाम मुसळे (रा. वाल्हेकरवाडी) या लॉटरी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५. भा.द.वि. कलम ४२० व द गेमिंग अॅन्ड लॉटरीज (अमेन्डमेन्ट) अॅक्ट २०१९ चे कलम ४ अन्वये एकुण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ६,७००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये २६ व्हिडीओ गेम मशीन, ७ एल.ई.डी. टि.व्ही. रोख रक्कम मोबाईल फोन, व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
देहुरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत साई व्हिडीओ गेम पार्लर या ठिकाणी छापा मारून साई व्हिडीओ गेम पार्लर चालक समीर शेख (रा. देहुगाव) व गणेश खंडेलवाल व इतर २ आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच जय मातादी व्हिडीओ गेम पार्लर चालक हरिश विठ्ठल तिटकरे (रा. किवळे) याच्याविरुध्द कारवाई करुन २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत देहुरोड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५. भा.द.वि. कलम ४२० व. द गेमिंग अॅन्ड लॉटरीज् (अमेन्डमेन्ट) अॅक्ट २०१९ चे कलम ४ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आला असुन २,७०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये १३ व्हिडीओ गेम मशीन, रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तसेच वाकड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या एका महिला आरोपीस अटक करण्यात आली असुन, दोन पिडीत महिलांची मुक्तता करण्यात आली आहे.
ही कारवाई अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन, कारवाईमध्ये प्रशांत अमृतकर, सपोआ गुन्हे व गुन्हे शाखेकडील ७ पोलीस निरीक्षक, ५ सपोनि /पोउपनि ४० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
















