न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा कुदळवाडी क्र.८९ येथे बुधवारी (दि. १६) रोजी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व उपायुक्त संदीप खोत यांच्या हस्ते शाळेतील बोलक्या भिंती व विद्यार्थी ओळखपत्राचा वितरण समारंभ संपन्न झाला.
प्रदीप जांभळे पाटील यांनी उद्घाटनाच्या वेळी शाळेच्या इमारत बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे, शालेय शिस्त, व्यवस्थापन व नियोजन यांचे कौतुक केले. तसेच शाळेतील शिक्षक उत्कृष्टपणे काम करीत असल्याचे गौरवोद्गार काढले. शिक्षकांनी उत्कृष्टपणे अध्यापन केल्यामुळे शाळेचा दर्जा चांगला असल्याचे शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेतील यशावरून जाणवते. शाळेच्या यशाची परंपरा अशीच अखंडपणे सुरू ठेवावी असे सांगितले. शाळेतील रिक्त पदे समायोजनातून व मानधन नेमणूकीतून भरली जातील. शाळेच्या खेळाच्या मैदानासाठी लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाईल. परंतु, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
या कार्यक्रमास स्वी. सदस्य दिनेशशेठ यादव, कुंदन गायकवाड मा. फ प्रभाग अध्यक्ष, संभाजीराव बालघरे, विशाल बालघरे, आनंदराव यादव, तात्यासाहेब सपकाळ, संतोष मोरे (स्वी. नगरसदस्स्य), अंकुश मळेकर, दिलशादबी शिकलगार, ऋषी माने, सौ.रेखा हजारे (अध्यक्षा-शाळा व्यवस्थापन समिती) व इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्र. मुख्याध्यापक संपत पोटघन व सर्व शिक्षकांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल बगाटे व आभार प्रदर्शन खामकर मारूती यांनी केले.