- नवले पूलावरील अपघाताच्या तपासात कारण आलं पुढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाने ४८ वाहनांना धडक दिली. यानंतर या गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान यामागे दुसरं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तपासा दरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचं समोर आलं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त (सिंहगड रस्ता विभाग) सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरटीओने वाहनाची तपासणी केली असता, ब्रेक फेल झालं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. प्राथमिकदृष्ट्या चालकाने इंधन वाचवण्यासाठी उतारावर इंजिन बंद करत न्यूट्रल गेअरवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. पण नंतर वाहनाने वेग पकडल्याने तो ब्रेक दाबू शकला नाही”.
दुर्घटनेनंतर घटनास्थळावरुन फरार झालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. मणिराम छोटेलाल यादव असं या चालकाचं नाव असून, तो मध्य प्रदेशचा आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात ते आठ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
















