न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने टाकाऊ वस्तूंपासून १५ शिल्प तयार करण्यात आली आहेत. ती शहरातील वेगवेगळ्या चौकांत उभारण्यात आली असून, उद्घाटनाअभावी ती धूळ खात आहेत. आता आणखी ८ शिल्पे टाकाऊतून बनविण्यात येणार आहेत. ती शिल्प उभारल्यानंतर त्याभोवती सुशोभीकरण्यासाठी आर्किटेक्ट सल्लागाराला ९ लाख रुपये शुल्क दिले जाणार आहे.
पालिका टाकाऊतून आणखी ८ शिल्प तयार करीत आहे. ही शिल्पे निश्चित झालेल्या ठिकाणी नेणे, त्या ठिकाणी त्याचे पेडेस्टल व फाउंडेशन तयार करणे, शिल्पाच्या आजूबाजूला सुशोभीकरण करणे त्यासाठी आर्किटेक्ट नेमण्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले होते. त्यात शिल्पी आर्किटेक्ट अॅण्ड प्लॅनर्स, टंडन अर्बन सोल्युशन व निओजेन कन्सल्टंट्स अशा ३ एजन्सीचे दर पात्र ठरले. सर्वांत कमी ९ लाख ८० हजारांचा दर शिल्पी आर्किटेक्टकडून प्राप्त झाला. तो दर मंजूर करण्यात आला. दर कमी करून शिल्पी आर्किटेक्टने ९ लाखांत काम करण्यास सहमती दिली आहे. या पुर्वीचे कामही शिल्पी आर्किटेक्टने केले असून, १५ शिल्पासाठी ९ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.
शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहेत. शहरात एकूण १ हजार २०० किलोमीटर अंतराचे रस्ते असून, १८४ उद्याने आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ठिकठिकाणी शिल्प उभारण्यात येत आहेत. त्यात एकूण १५ शिल्प तयार करण्यात आली. ती सर्व शहरातील वेगवेगळ्या चौकांत उभारण्यात आले आहेत. मात्र, पाच महिने उलटूनही अद्याप त्या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. ती शिल्पे कापडात झाकून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चौकांच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे.
















