- छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व जगविख्यात आहे. शिवाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वादग्रस्तपणे बोलणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांचे अचूक ज्ञान असलेले राजे होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीही त्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केले आहेत. त्यामुळे त्यांनी विचार करून बोलावे. कारण अशा वक्तव्यांमुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयीस्करपणे मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती. आता राष्ट्रपतींनीच राज्यपाल कोश्यारी यांना परत बोलवावे, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून चर्चेत राहण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा प्रयत्न दिसून येतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आपल्या वक्तव्याचा समाजावर काय परिणाम होईल, याचा विचार करून बोलले पाहिजे, असेही रामभाऊ जाधव म्हणाले.
















