न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- व्हॉट्सअॅपवरून फोटो पाठवून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. यात तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली.
स्नेहल राजेंद्र भोसले ऊर्फ स्नेहल ऋषिकेश कदम (वय २८), रॉकी ऊर्फ ऋषिकेश शिरीष कदम (वय ३०, दोघेही रा. मॉडेल कॉलनी, पुणे) यांच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सोमवारी (दि. २१) आरोपी स्नेहल व तिचा पती रॉकी असे नाव सांगून मोबाइलवरून कॉल व व्हॉट्सअॅप कॉल करून महिलांचे फोटो पाठवून वेगवेगळ्या हॉटेल व लॉजवर महिलांना घेऊन जाऊन वेश्या व्यवसाय करवून घेतात, अशी माहिती मिळाली.
त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी हिंजवडी हद्दीतील हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यावेळी महिला आरोपी तिच्यासोबत महिलेला घेऊन हॉटेलमध्ये आली. त्यावेळी पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकून कारवाई करून पीडित तीन महिलांची सुटका केली. पोलिसांनी चार हजारांची रोकड, ६० हजारांचे इतर साहित्य, १२ हजारांचा एक मोबाइल फोन, असा एकूण १६ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलिस कर्मचारी कल्याण महानोर पथकाने ही कामगिरी केली.


















