न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड सेक्टर चार येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह येथे विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती वसतिगृहाचे गृहपाल एम. डी. वाघमारे यांनी दिली आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती ५७, विशेष मागास प्रवर्ग २, अनाथ २ जागेकरीता प्रवेश देण्यात येणार आहे.
पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात अकरावी, पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी वसतिगृहात जाऊन नोंद करावी.
या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ८०० रुपये विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते. विद्यार्थी हा पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकाचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, महाविद्यालय प्रत्यक्ष सुरु असल्याबाबत प्राचार्य यांचे लेटरहेडवर लेखी हमीपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असल्याची माहिती वसतिगृहाचे वाघमारे यांनी दिली आहे.