न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- रेल्वे मार्गावर फोटोशूट करणे, रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. अटक केलेल्या दोघांनी देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ रुळावर व्यायाम करतानाचे फोटोशूट आणि रील बनवले आहेत.
विक्रम सिंह जोधसिंह राठोड (वय २५), महेशभाई रत्नाभाई स्वारी (वय १८, दोघे रा. भीमाशंकर नगर, मुकाई चौक, रावेत, देहूरोड) यांना अटक केली आहे. बेगडेवाडी-देहूरोड रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी (दि. २३) सायंकाळी आरोपी रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक ए के यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी एन लाड, कर्मचारी बी पी पवार, समाधान बागुले यांनी तात्काळ धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
विक्रम आणि महेशभाई हे दोघेजण रेल्वे ट्रॅकवर पुशअप्स तसेच वेगवेगळ्या पोझमध्ये झोपून, चालून फोटो, व्हिडीओ काढत होते. ते फोटो, व्हिडीओ त्यांना सोशल मीडियावर अपलोड करायचे असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
रेल्वे ट्रॅकवर फोटो, व्हिडीओ काढल्याबाबत विक्रम आणि महेशभाई या दोघांवर रेल्वे कायदा कलम १५४, १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्ष कारावास अथवा आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. रेल्वे ट्रॅकवर जाऊन फोटो, व्हिडीओ काढू नका, अन्यथा कारागृहात जावे लागेल, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.















