न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काही गाळे धूळ खात पडून आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८ गाळे भोसरी मंडईतील तर इतर भागातील १६ गाळ्यांचा समावेश आहे. तर एकुण गाळ्यांपैकी निगडी, अंजठानगर येथील ३३ व्यापारी गाळे वाटप करण्यायोग्य स्थितीत राहिले नाहीत. तर ९३६ गाळ्यांपैकी ८३९ गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती महापालिका भूमी आणि जिंदगी विभागाने दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, रावेत, संभाजीनगर, सांगवी यासह आदी भागात महापालिकेचे ९३६ व्यापारी गाळे आहेत. यामध्ये भाजी मंडई, व्यापारी संकुले, उद्यान परिसरातील गाळ्यांचा समावेश आहे. यामधील काही गाळे हे बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे तर काही गाळे आड बाजूला आहेत. त्यामुळे महापालिकेच्या काही गाळ्यांना मागणी असते तर काहींना नसते. मात्र, त्यानंतरही भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी या विभागाचा पदभार स्विकारल्यापासून रखडलेले गाळे वितरित करण्यासाठी वारंवार वर्तमान पत्रात जाहिराती दिल्या. मागेल त्याला गाळा ही संकल्पणा राबविली. त्यामुळेच धूळखात ९३६ गाळ्यांपैकी ८३९ गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहेत. दुसरीकडे वारंवारअर्ज मागवूनही भोसरी भाजी मंडई येथील पहिल्या मजल्यावरील २२ आणि दुसऱ्या मजल्यावरील २६ अशा ४८ गाळ्यांसह इतर भागातील १६ अशी ६४ गाळे धूळखात पडून आहेत. आकुर्डी येथील पांडुरंग काळभोर सभागृह येथील २१ आणि अंजठानगर येथील १२ अशा ३३ गाळ्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हे गाळे वितरणा योग्यच नसल्याचे भूमी आणि जिंदगी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे वारंवार अर्ज मागवूनही काही भागातील व्यापारी गाळ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने दुरावस्था झालेल्या गाळ्यांची दुरूस्ती करावी की नाही असा पेच पालिका प्रशासनाला पडला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील गाळे तात्पुरते, भाडेकराराने, लिलावाने वितरण केले जाते. काही गाळे ५ ते १० वर्षे करानामा करून मासिक भाडे या तत्वावर वितरित केले आहेत. यामधून महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाला ६ कोटी १४ लाख ४५ हजार ७४९ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर १ कोटी २२ लाख ९७ हजार रूपये गाळेधारकांकडून येणे बाकी आहेत.
भूमी आणि जिंदगी विभागाच्या ताब्यात असलेल्या गाळ्यांचे वितरण करण्यासाठी सातत्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु असते. तात्पुरते, भाडेकराराने लिलावाने गाळ्यांचे वितरण केले जाते. गेल्या वर्षभरात जास्तीत-जास्त गाळे वितरित कसे होतील, यासाठी मागेल त्याला व्यापारी गणी गाळा ही संकल्पना राबविली. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
– प्रशांत जोशी, सहाय्यक आयुक्त – भूमी आणि जिंदगी विभाग…















