- रॅपीडो बाईक प्रवासी वाहतूक आस्थापनावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- रॅपिडो (रोपन ट्रान्सपोर्टेशन सव्हसेस प्रा.लि) या कंपनीस राज्यात शासनाने तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी या संवर्गासाठी कोणताही परवाना/ लायसन्स दिलेले नाही. तरीही या कंपनीने पिंपरी चिंचवड परिवहन विभागात रॅपिडो या बाईक टॅक्सीसाठी विनापरवानगी बेकायदेशीर ऑनलाईन अॅप सुरु केले.
हे अॅप कायदेशीर असल्याचे दुचाकी वाहन चालकांना व प्रवाशांना भासवले. बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातुन बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करवुन घेतली. त्याच्या मोबदल्यात स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२१ पासुन अदयापपर्यंत पिंपरी चिंचवड परिवहन विभागात ऑनलाईन पध्दतीने सुरु होता. पिंपरी चिंचवड शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात फिर्यादी हे मोटार वाहन निरीक्षकपदी नेमणुकीस आहेत. त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोपन ट्रान्सपोर्टेशन सव्हसेस प्रा.लि (ऑफीस क्रं ७, ३ मजला, सुयश प्लाझा, भंडारकर रोड, शिवाजीनगर, पुणे) च्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खाजगी कंपन्यांचा प्रवासी वाहतूकीमध्ये सहभाग वाढल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यात भरीस भर म्हणून रॅपीडो बाईक प्रवासी वाहतूक करत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही आरटीओ कार्यालय, शासनाचे अधिकारी व नेतेमंडळी दखल घेत नाहीत. त्यामुळे रॅपीडो बाईक पुर्ण बंद होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला होता. याची शासनाने दखल घेतली असून रॅपीडोवर गुन्हा दाखल केला आहे.
















