न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- राज्यात पोलिस भरती होत आहे. यात सर्वच घटकांना आरक्षण तसेच विविध माध्यमांतून सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासह आता तृतीयपंथींनादेखील या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन तृतीयपंथींना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांच्याकडून मंगळवारी (दि. २९) देण्यात आले आहेत.
ट्रान्सजेंडर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण पोलिस भरतीमध्ये नाही. त्यामुळे भरतीमध्ये लैंगिकतेवरून भेदभाव होत असल्याचा आरोप तृतीयपंथींनी केला. पिंपरी- चिंचवड येथील तृतीयपंथी निकिता यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन दिले होते. निकिता या ‘ट्रान्स’ वर्गवारीतील आहेत. पालिकेच्या सुरक्षा विभागात सुरक्षारक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत. सध्या त्यांच्यासह इतर तृतीयपंथीदेखील पोलिस भरतीसाठी सराव करीत आहेत.
भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्यासाठी तृतीयपंथीसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा. तसेच भरतीसाठी महिला उमेदवारांना असलेले निकष त्यांच्यासाठी असावेत, असेही मॅटने आदेशात नमूद केले आहे.