न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मार्च) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटीच्या सन २०१९ -२०२० च्या ८४७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवार (दि. १) मान्यता देण्यात आली. ३४ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत ३४४ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली.
महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची बैठक झाली. या बैठकीला स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमण, स्मार्ट सिटीचे वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
एरिया बेस अंतर्गत पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव परिसरातील रस्ते, चौकांचे सुशोभीकरण करणे, सार्वजनिक स्वच्छतागृह, दोन उद्याने विकसित करणे या कामाच्या ३४४ कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. हे काम बी. जे. शिर्के यांना देण्यात आले. त्याचबरोबर पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव परिसरात प्रायोगिक तत्वार ई-स्कूटर प्रकल्प सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय शहराच्या उर्वरित भागामध्ये सायकल शेअरिंग सुरु करण्यास मान्यता मिळाली. आठ दिवसात सर्व भागात सायकल शेअरिंग सुरु केले जाईल. भविष्यातील आवश्यक स्कील डेव्हलपमेंट आणि नद्यांच्या विकासासाठी कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला देखील मंजुरी मिळाल्याचे, हर्डीकर यांनी सांगितले.











