न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृती कार्यशाळेला वारंवार दांडी मारणे ७ उपायुक्त आणि ४ सहायक आयुक्तांना चांगलेच अंगलट आले आहे. कार्यशाळेस अनुपस्थित राहून कर्तव्यात कसूर आणि कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत या ११ अधिकाऱ्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी, आकाश चिन्ह परवाना विभागाचे सचिन ढोले, उद्यान विभागाचे सुभाष इंगळे, समाज विकास विभागाचे चंद्रकांत इंदलकर, भांडार विभागाचे मनोज लोणकर, एलबीटीच्या स्मिता झगडे, शिक्षण विभागाचे संदीप खोत, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, करसंकलन विभागाचे नीलेश देशमुख, झोपडपट्टी विभागाच्या सुषमा शिंदे आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांना गुरुवारी (दि. १) नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये? याचा लेखी खुलासा तीन दिवसात सादर करण्यास सांगितले आहे.