- तीन गंभीर तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी फिरण्यासाठी आलेल्या खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस लोहगड किल्ल्याजवळ असलेल्या दुधिवरे खिंडीत ४० फूट खाली कोसळली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले, तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास घडली होती.
पेण येथील एका खासगी क्लासेसचे विद्यार्थी मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर विवारी आले होते. यामध्ये ७२ विद्यार्थी, चार शिक्षक तर इतर कर्मचारी असे एकूण ८० जण होते. जखमींना लोणावळा, सोमाटणे येथील खासगी रुग्णालय व काले येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींना लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढले, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस सहायक निरीक्षक नीलेश माने यांनी दिली.