काँग्रेसचे जुनी सांगवी येथे ‘चलो वार्ड अभियान’ संपन्न
सांगवी (दि. ५ मार्च) :- देशातील गरीब श्रीमंत ही दरी कमी करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवाशक्ती कार्ड हा पाच कलमी कार्यक्रम राज्यभर सुरु केला आहे. याचा युवकांनी फायदा घ्यावा, सरकारची जबाबदारी फक्त शिक्षण देण्याची नाही, तर रोजगार मिळून देण्याचीही आहे, त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगार मिळेपर्यंत मासिक बेरोजगार भत्ता देण्याचा निर्णय काँग्रेसची सत्ता आलेल्या तीन राज्यात प्रत्यक्षात आणला आहे, असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले.
जुनी सांगवी येथे काँग्रेसच्या वतीने ‘चलो वार्ड अभियान घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहीत शेळके यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात काश्मीरमधील पुलवामा येथे शाहिद झालेल्या CRPF च्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
यावेळी शहर युवक काँग्रेसच्या प्रभारी कल्याणी माणगावे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष संदेश बोर्डे, पिपंरी चिंचवड काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रशेखर गायकवाड, महिला काँग्रेस युवती सेल्सच्या उपाध्यक्ष नूतन शेळके, वसीम शेख, स्नेहल गायकवाड, कुंदन कसबे, वीरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.