- स्वतःच्याच अहवालातील निष्कर्षांकडे दुर्लक्ष म्हणजे फोजदारी गुन्हा..
- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच अध्यक्ष विजय पाटलांचा गौप्यस्फोट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- काही दिवसांपूर्वी पवना नदीच्या केजुबाई बंधारा येथे मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याने पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली. परंतु पर्यावरण प्रेमींची हळहळ व्यर्थ ठरली असुन महापालिका प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेला नदी प्रदूषण बाब १० वर्षांपूर्वीच माहिती असून याबाबत सन २०१३ मध्येच त्यांनीच नदीच्या पाण्याबद्दल व गुवत्तेबद्दल तपासणी अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाचा साधा अभ्यास करण्याची सवड १० वर्षे पालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही. अनेक अधिकाऱ्यांना अहवाल प्रसिद्ध होऊनही तो उघडून वाचावा असे वाटले नाही. अधिकाऱ्यांनी अहवालात प्रसिद्ध झालेल्या नदी प्रदूषणाबाबत थोडेसुद्धा गांभीर्य घेतले नाही. त्यामुळे त्याबाबत ठोस कार्यवाही केली नाही. अहवालास या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे आज पवना नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आणि शेकडो जलचरांना प्राणास मुकावे लागले. वेळीच दखल घेतली नाही तर पवना नदीमध्ये एकही जलचर प्राणी जिवंत दिसणार नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ – अल्ट्राटेक एंनव्होर्नमेंट कन्सल्टंन्सी अँड लॅबोरेटरी ने पवना नदीच्या पाण्याचे विविध ठिकाणांहून नमुने गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने तज्ज्ञांकडून तपासणी केली होती. त्या सर्व नमुन्यांचा एकत्रित अहवाल २०१३ साली प्रसिद्ध करण्यात आला होता. पवना नदी ही मुळा व इंद्रायणी नदीपेक्षा जास्त प्रदूषित आहे. नाल्यांचे पाणी नदीत मिसळल्याने तसेच घरगुती सांडपाणी, औदयोगिक सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे नदी प्रदूषणात भर पडते. पाण्याची केमिकल ऑक्सिजन डिमांड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार (१५० मि.ग्राम/लिटर) पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. पवना नदीच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये केमिकल ऑक्सिजन डिमांड १५० मि ग्राम/लि पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास येते. पवना नदीचा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) वारंवार ३० मि ग्राम/लिटर पेक्षा अधिक दिसून येत असल्याने हे पाणी शेतीसाठी अनुकूल नाही तसेच मासेमारी किंवा प्राण्यांसाठीही वापरायोग्य नाही. मानवी हस्तक्षेप आणि नाल्यांचे पाणी मिसळल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. रात्री फायटोप्लॅनटनस मार्फत प्रकाश संयुषणलेशनाची क्रिया होत नाही ज्याचा परिणाम म्हणून ऑक्सिजनची निर्मिती नदीच्या पाण्यात होत नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच पाण्याच्या तळाशी असलेल्या या परस्थितीमुळे पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत पावतात. मासे जिवंत राहण्यासाठी डी ओ ची पातळी नदीच्या पाण्यात ४ मि ग्राम /लि असणे गरजेचे आहे. नदी पाणी तपासणीबाबत अशा अनेक बाबी २०१३ मधील महापालिकेच्या अहवालात नमूद आहेत.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ” प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातर्फे (दि. १३ ते १६ डिसेंबर पर्यंत) पवना नदीच्या प्रदूषणाबाबत एक महत्वपूर्ण निरीक्षण केले गेले. त्याचा अहवाल दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पवना नदी ही शहराची जीवन वाहिनी असून तिचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नदीचे गटारीत रूपांतर होण्यामागे वाढते शहरीकरण व नदी स्वच्छता अभियानाची पालिकेला असलेली अनास्था ही प्रमुख कारणे प्रकर्षाने दिसून येत आहेत. आपल्याच प्रशासनाच्या अहवालास केराची टोपली दाखवून १० वर्ष त्या अहवालाच्या निष्कर्षांवर दुर्लक्ष करणे म्हणजे फोजदारी गुन्हा ठरतो. ”
















