- विवाहबाह्य प्रेमसंबंधास वैतागून सख्या मुलांकडून जन्मदात्याचा खून..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- सख्या वडीलांचा खुन करुन दृश्यम चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी योजना बनवत प्रेताची विल्हेवाट लावली. याप्रकरणी महाळुंगे पोलीसांनी अवघ्या २ तासात गुन्हयाची उकल करीत सख्या भावांना गजाआड केले आहे.
धनंजय नवनाथ बनसोडे (वय ४३ वर्ष) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. महाळुंगे पोलीसांनी मयत इसमाची मुलं सुजित धनंजय बनसोडे (वय २२ वर्ष), अभिजित धनंजय बनसोडे (वय १८ वर्ष, दोघेही राहणार मौजे निघोजे, ता. खेड, जि. पुणे) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथे मयत इसमाचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय होता. त्याची ग्लोबल फुड्स नावाची कंपनी होती. मयत इसम (दि. १५/१२/२०२२) रोजी १०:०० ते (दि. १६/१२/२०२२) रोजी ९:०० वा चे दरम्यान राहत्या घरातुन कोठेतरी निघुन गेल्याचे तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मिसिंग प्रकरणाचा अधिक तपास करत असताना मिसिंग व्यक्ती धनंजय बनसोडे व नागपुर येथील महिला यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षापुर्वी फेसबुक सोशल मिडीयाद्वारे ओळख होवुन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रेमसंबंधाची माहिती समजल्यानंतर मृत धनंजय याच्या घरात पत्नी व मुले यांच्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले. प्रेमसंबंध मुलांना मान्य नव्हते. त्यामुळे आपली मुले हे आपला घातपात करुन जिवे ठार मारतील अशी शंका मयत धनंजय यास आली होती. तशी शंका मयत धनंजय याने त्याच्या नागपुर येथील प्रेमिकेस बोलुन दाखवली होती. या मानव मिसिंगमध्ये महाळुंगे पोलीस चौकी गुन्हा रजि नंबर १९४९/२०२२ भा.द.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
महाळुंगे पोलीसांनी मयत धनंजय याची मुले सुजित व अभिजित यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला. दोघांनी वडील धनंजय यांचे नागपुर येथील महिलेशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे वडीलांचा खुन करुन पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत गुन्हयात अटक केली असून पुढील तपास चालू आहे. ही घटना अतिशय गंभीर व हिंस्त्र स्वरुपाची असुन महाळुंगे पोलीसांनी कौशल्याचा वापर करुन गुन्हा अतिशय कमी वेळात उघडकीस आणला आहे.















