न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- शंभर किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहरातील हाउसिंग सोसायट्यांना तो कचरा आपल्या सोसायटीतच जिरवण्यासाठी कंपोस्टिंग प्रकल्प सुरू करणे बंधनकारक आहे. त्या सोसायटीचा कचरा महापालिका उचलणार नाही. केंद्राच्या या नियमावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. त्या समितीची बैठक आठवड्याभरात आयोजित केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या हाउसिंग सोसायट्या व आस्थापनांना त्या कचऱ्याची आपल्याच भागात कंपोस्टिंग प्रकल्प उभारून विल्हेवाट लावणे सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास ५ हजार रुपयांपासून दंड आहे.
यासंदर्भात प्रशासनाने सर्व हाउसिंग सोसायट्यांना गेल्या चार ते पाच वर्षांपासून वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांना दंड ही केला आहे. या नियमानुसार पालिकेने १ ऑक्टोबर २०२२ पासून मोठ्या सोसायट्यांचा ओला कचरा स्वीकारण्यास नकार दिला होता. तशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करीत त्यावर चर्चा काढून तोडगा काढण्याची सूचना आयुक्त शेखर सिंह यांना केली. त्यानुसार, पालिकेने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. त्यात आरोग्य कार्यकारी अधिकारी (सदस्य सचिव), आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे दत्तात्रय देशमुख व संजीवन सांगळे, ईसीएम या स्वयंसेवी संस्थेच्या विनीता दाते व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे. या समितीची बैठक आठवड्याभरात आयोजित केली जाणर आहे. त्यास कंपोस्टिंग प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक अधिकृत कंपन्यांची तसेच, घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जाणार आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुचना केली होती. त्यानुसार शहरातील हाउसिंग सोसायट्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून १०० किलो ओला कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्याकरिता स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. त्यातून सकारात्मक मार्ग काढला जाणार आहे, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.















