न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- देहूतील इंद्रायणी नदी पात्रात अनधिकृतपणे वाळू उपसा प्रकरणी शनिवारी (दि. २४) पहाटे तीन वाजता पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कारवाई केली.
तहसीलदार गीता गायकवाड यांनी आज पहाटे तीन वाजता आपल्या सहकाऱ्यांसह डंपरमध्ये बसून वाळू उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी प्रवेश केला.या कारवाईमध्ये तीन ट्रॅक्टर, दोन पोकलेन याप्रमाणे पाच मशिनरी जप्त करून देहूरोड पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडलाधिकारी शेखर शिंदे, मंडलाधिकारी बाबा साळुंके, देहूगाव तलाठी सूर्यकांत काळे, मोशी तलाठी अतुल गीते, महसूल सहायक उन्मेष मुळे, महसूल सहायक महेश गायकवाड, पोलिस पाटील चंद्रसेन टिळेकर, पोलिस पाटील सुभाष चव्हाण, शिपाई तुषार सोनवणे, शिपाई रोहीत चक्रनारायण, चालक ज्ञानेश्वर गोठे सहभागी होते.















