- पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२३) :- नवीन वर्षात पिंपरी- चिंचवड शहर भयमुक्त करण्याचा निर्धार पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केला आहे. त्यासाठी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती, समाजकंटकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून आगामी काळात गुन्हेगारांची मुस्कटदाबी करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ३०) चौबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते.
पिंपरी – चिंचवड आयुक्तालय नवीन असल्याने आयुक्तालयात अजूनही अनेक गोष्टींची कमतरता आहे. काही प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत. याचा पाठपुरावा करून प्रस्ताव येत्या वर्षात मंजूर करून आणण्याकडे विशेष लक्ष राहणार असल्याचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
शहरातील सायबर क्राईम झपाट्याने वाढत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच गुन्हे रोखण्यासाठी सायबर क्राईम विभाग सक्षम होणे अत्यावश्यक आहे. येत्या वर्षात हा विभाग सक्षम करण्यावर भर राहणार आहे. प्रशिक्षित अधिकारी, अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून हा विभाग सक्षम करण्यात येणार आहे, असेही चौबे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरातील काही भागांमध्ये वाहतुकीची समस्या जाणवते. त्यामुळे पोलिस आयुक्त चौबे यांनी शहरातील वाहतूक नियोजन करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी वाहतूक विभागाला स्वतंत्र वाहतूक उपायुक्त नियुक्त करणार असून याचा प्रस्ताव दिल्याचे चौबे यांनी सांगितले.
स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढवली जाणार आहे. पोलिस आणि नागरिकांचा समन्वय रहावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत पोलिस महत्त्वाच्या चौकांत आणि रस्त्यांवर गस्त घालणार आहे. या वेळेत नागिरक पोलिसांसोबत संवाद साधू शकणार आहेत. आपल्याला येणाऱ्या अडचणी, आपल्या भागात होणारी गुन्हेगारी तसेच अवैध गोष्टींबाबत नागरिक थेट या पोलिसांशी संवाद साधून शकणार आहेत. त्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देण्यात आल्या आहेत, असे चौबे यांनी सांगितले.















