- पिंपरी-चिंचवड ते वनाज दरम्यान मेट्रोची ट्रायल यशस्वी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड ते वनाज हा रस्त्यावरून किमान दीड तास लागणारा प्रवास शनिवारी अवघ्या ४० मिनिटात झाला. तोही वातानुकूलित कोचमधून. झालेला हा प्रवास अतिशय आनंददायी होता. असे डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले. त्यांनी प्रवासानंतर वनाज स्थानकात बोलताना सांगितले. यावेळी संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे, मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या मार्गावर चाचणी म्हणून हा प्रवास झाला असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
डॉ. दीक्षित म्हणाले, पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गावरची मेट्रो रेंजहिलपासून भुयारात जाते व सिव्हिल कोर्ट स्थानकात येते. वनाज ते रामवाडी मार्गावरची मेट्रो रस्त्यावरील खांबावर असणाऱ्या मार्गावरून सिव्हिल कोर्ट स्थानकात येते. त्यामुळे सिव्हिल कोर्ट स्थानक हे इंटरचेंज स्थानक आहे. पीसीएमसी स्थानकातील मेट्रोमधून निघालेले आम्ही सर्व सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकातून वर येऊन वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोमध्ये बसलो व वनाज मेट्रो स्थानकात आलो.
मेट्रोमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही जुळी शहरे आता जोडली गेली. दोन्ही शहरांमध्ये ये-जा करणाऱ्यांसाठी आरामदायी, वेळ वाचविणारा आणि किफायतशीर दरात प्रवासाचा पर्याय मेट्रोने तयार केला आहे, असे दीक्षित यांनी सांगितले. रेल्वे, एसटी, पीएमपी तसेच रिक्षा व अन्य प्रवासी सेवांबरोबर समन्वय ठेवण्यात आला आहे. आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून परीक्षण होईल. त्यानंतर येत्या काही महिन्यात पिंपरी- चिंचवड महापालिका ते वनाज व्हाया सिव्हिल कोर्ट स्थानक या मेट्रो मार्गावरून प्रवासी प्रवास करू शकतील, अशी खात्री दीक्षित यांनी दिली.
१५ किलोमीटरच्या या प्रवासात काही ठिकाणी थांबून स्थानकाची पाहणी केली. तिथे थोडा वेळ गेला. तो वगळून या प्रवासाला साधारण ४० मिनिटे लागली. असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रोचा वेग सर्वसाधारण होता. तो नेहमीसारखा झाल्यास हा प्रवास ४० मिनिटांपेक्षाही कमी वेळात होईल, असा दावाही अधिका-यांनी केला आहे.















