- वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची व्यथा; म्हणून उपसलयं संपाचं हत्यार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागेसाठी तसेच निवासी डॉक्टरांच्या स्टाईफंड आणि इतर मागण्यासाठी ‘मार्ड’ च्या माध्यमातून संपाचे हत्यार उपसले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात देखील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व डॉक्टरांनी केवळ आपत्कालीन सेवा दिली आहे. डॉक्टरांनी रुग्णालयाच्या आवारात एकत्र येत आज सोमवारी पालिकेच्या बायोमेट्रिक पद्धती आणि इतर मागण्यांसाठी आज आंदोलन केले. जवळपास ७० निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते.
याबाबत बोलताना वायसीएम रुग्णालयाचे निवासी डॉक्टर अमोल राठोड म्हणाले, आजपासून वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी वायसीएम ‘मार्ड’ संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. याआधी आम्ही महापालिका आयुक्त आणि वायसीएमचे अधिष्ठाता यांच्याकडे आमच्या मागण्या सोडविण्या बाबत मागणी केली होती. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. निवासी डॉक्टर रुग्णालयात चोवीस तास सेवा देतात. त्यांना बायोमेट्रिकची सक्ती नकोय. कोणत्याच मेडिकल कॉलेजमध्ये ती नाही. आमची हजेरी आमच्या विभागातून जाते. पालिकेने आमचा दोन ते तिन महिन्यांचा पगार कपात केला. चोवीस तास काम करून पगार मिळत नाही, अशी आमची अवस्था आहे. सध्या कुठल्याही इमर्जन्सी सेवा आम्ही बंद केल्या नाहीत. मात्र, मागण्या मान्य नाही झाल्यास या इमर्जन्सी सेवा बंद करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्डच्या संपाला पाठींबा दिला आहे. त्यांच्या होस्टेल, पेमेंट, बायोमेट्रिक आणि इतर काही मागण्या आहेत. त्या मागण्यां संदर्भात शासन स्तरावर वाटाघाटी सुरु आहेत. त्याबाबत प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्याबाबत आमच्याशी पत्रव्यवहार करावा. आयुक्तांसमोर त्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येईल. रुग्णसेवेत बाधा येणार नाही अशा पद्धतीने संप करण्याचे आवाहन आम्ही त्यांना केले आहे.
– राजेश वाबळे, अधिष्ठाता-पदव्युत्तर शिक्षण संस्था व वायसीएम रुग्णालय, पिंपरी…


















