न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- सलग तीन वेळा चिंचवड विधानसभेचं नेतृत्व केलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष, लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं आज मंगळवारी (दि. ३) रोजी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे. त्यांना कर्करोगाचं निदान झालं होत. त्याचं वय ५९ वर्ष होतं.
त्यांच्या अकाली जाण्याने पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी ३ ते ६ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी असेल. संध्या ७ वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
आज मंगळवारी (दि. ३) रोजी उपचारादरम्यान सकाळी बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे.
शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे त्यांचा राबता होता. सलग चार वेळा नगरसेवक आणि चार वेळा आमदार राहिले. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते. सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले होते. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
















