न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- पिंपरी- चिंचवड शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ शिवशंकर शिंदे यांचे त्यांच्या काळेवाडी येथील कार्यालयातून अपहरण झाल्याची घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी घडली. त्यानंतर शिंदे यांचा मृतदेह तेलंगणा राज्यातील महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील एका गावात आढळला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, शिंदे यांच्या हत्येचा शहरातील वकील बांधवांनी निषेध व्यक्त केला. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप वकील बांधवांकडून करण्यात आला.
घटनेतील मुख्य आरोपी, वाहनचालक आणि त्याचा एक साथीदार अशा तिघांना अटक केली आहे. शिंदे यांच्या पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींना मंगळवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १३ जानेवारी पर्यंत (दहा दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन आणि वकील बांधवांकडून शिंदे यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी पुरावे असताना देखील उशिराने तपास सुरु केला. पोलिसांनी तपासात उशीर केल्याने शिंदे यांचा जीव गेला. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आरोपींचे वकीलपत्र घेणार नसल्याचे देखील वकिलांनी सांगितले. पिंपरी न्यायालयातील वकिलांनी स्वतः एक दिवस काम बंद ठेऊन निषेध केला. वकिलांच्या संरक्षणासाठी वकील संरक्षण कायदा लागू करावा, याबाबत देखील पाठपुरावा करून शिंदे यांचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
















