न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. या नद्या अतिप्रदुषित झाल्या असून, त्यात दरवर्षी जलपर्णी निर्माण होते. जलपर्णी काढून पात्र स्वच्छ करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केले जाते. दरवर्षी जलपर्णी काढूनही ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते काम आता, पर्यावरण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. जलपर्णी कायमची नष्ट केली जाईल, असा दावा पर्यावरण विभागाने केला आहे.
नद्यांच्या सुधार प्रकल्पांवर पालिका तब्बल ४ हजार कोटी रुपये खर्च करीत आहे. तसेच मैला सांडपाणी प्रकल्पाच्या वाहिन्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रास (एसटीपी) जोडण्यात येत आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. मात्र, त्यात अद्याप पर्यावरण तसेच ड्रेनेज विभागास १०० टक्के यश मिळालेले नाही. शहरातील अनेक ठिकाणी थेट सांडपाणी व रासायनिक सांडपाणी नदीत मिसळत असल्याच्या कारणांवरून राष्ट्रीय हरित लवाद आणि राज्याच्या पर्यावरण विभागाने पालिका प्रशासनाला अनेकदा नोटीसा पाठवल्या, तरीही पालिकेकडून म्हणावे तशी सुधारणा झाल्याचे चित्र नाही. रासायनिक सांडपाणी मिसळते या कारणामुळेच स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेचे सर्वाधिक गुण घटले होते. परिणामी, शहर सर्वेक्षणात पिछाडीवर आहे. आता, या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम आरोग्य विभागाकडून काढून पर्यावरण विभागाकडे देण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे. पर्यावरण विभागाकडून शास्त्रक्त पद्धतीने जलपर्णी काढली जाणार आहे. त्यामुळे जलपर्णीचा प्रश्र कायमचा संपविला जाईल, असा त्यांनी दावा केला आहे. दरम्यान, जलपर्णी काढण्याचे काम आरोग्य विभागाने जून २०२३ पर्यंत दिले आहे. त्यानंतर ते काम पर्यावरण विभाग करणार आहे.
जलपर्णीमुळे नदीचा प्रवाह खुंटतो. त्यामुळे हवेतीलऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रभाव वाढतो. रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातन आणि शहरातील कारखान्यातील रासायनिकयुक्त सांडपाणी पाण्यात मिसळल्याने जलपर्णी वाढते. ते रासायनिक पाणी जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत जलपर्णीची वाढ बेसुमार होत राहते. जलपर्णी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यासाठी ते काम पर्यावरण विभागाकडे देण्यात आले आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.















